औरंगाबाद: एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या मध्य मतदारसंघातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्याच वेळी सेनेचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम मतदारसंघातील जबिंदा लॉन्सवर एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा होत असल्याने शहरवासीयांना आज ललकार आणि फुंकार दोन्ही एकाच वेळी ऐकायला मिळेल. प्रचारासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. खैरेसाठी ठाकरे यांच्यानंतर उद्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी वैजापूर येथे , ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांची कन्नड येथे तर हैदराबादचे आमदार टी राजा सिंह यांची सिडको एन ६ येथे सभा होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्यासाठी उद्या पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा रोड शो आणि सभा आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याची सभा शहरात झाली नाही. येत्या दोन दिवसात प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण तसेच राहुल अथवा प्रियंका यांची सभा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांचा आहे.
आज ठाकरे -ओवेसी सामना
औरंगाबाद की संभाजीनगर या मुद्द्यावर भांडणारे एमआयएम शिवसेना या दोन्ही पक्ष नेते आज एकाच वेळी शहरात सभा घेत आहेत. त्यामुळे दोघांच्याही भाषणाकडे राजकीय पंडितांचे डोळे लागले आहेत. मतदानाला अवघे चार दिवस उरलेत तर प्रचारासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. यावेळी चौरंगी लढत होत असल्याने प्रत्येक उमेदवार सावध पावले टाकताना दिसतो. एमआयएम आणि शिवसेना असाच सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा असलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. एमआयएमकडून अजूनही सेनेला हवा तसा प्रचार झालेला नाही. तर सेनेनेही अजून एमआयएमवर फारसा हल्ला चढवला नसल्याचे दिसते.
मुख्यमंत्री फडणवीस आणि खा.ओवेसी या दोन नेत्यांच्या सभा सोडल्या तर निवडणुकीचा माहोल जाणवणाऱ्या मोठ्या सभा शहरात झाल्याच नाहीत. त्यामुळे आजच्या ठाकरे आणि ओवेसी यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.